Kunal Raut Arrested: नागपूरात पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी (Maharashtra Pradesh Youth Congress) आंदोलन केले. यावेळी  नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन "मोदी की गॅरंटी" अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळं फासलं होतं. तसेच मोदी या शब्दावर भारत असं स्टिकर लावून पोस्टर्सवर खोड केली. याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Youth Congress) कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते.  (हेही वाचा - Nagpur Crime: ढाब्यावर जेवणावरून वाद, ट्रक चालकाची निर्घृण हत्या, तीन आरोपींना अटक)

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात.

केवळ स्वत:च्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे या निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले.