Weather Forecast

Maharashtra Weather Forecast for 17th April 2025: सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये हवामानाच्या विविध छटा अनुभवायला मिळत आहेत, मुंबईत गरमी आणि दमटपणा, विदर्भात पावसाच्या सरी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान दिसून आले, ज्यामुळे वाढत्या उष्णतेपासून थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर राज्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील उद्याचे हवामान हे बऱ्याच अंशी कोरडे असणार आहे. माहितीनुसार, मुंबईत कालचा दिवस हा या आठवड्यातील शेवटचा उष्ण दिवस होता. म्हणजेच या आठवड्यात मुंबईमधील तापमानात थोडी घट होऊ शकते.

पश्चिम उपनगरांमध्ये आजपासून आठवड्याच्या शेवटपर्यंत तापमान 31-33 अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात तरी मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही. मुंबईच्या आसपासच्या भागांत, जसे की ठाणे आणि नवी मुंबई, तापमान 34-36 अंशांपर्यंत जाऊ शकते. उष्णतेची लाट नसली तरी, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे आणि पाण्याचे नियमित सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. अहवालानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update:

उद्या राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, संभाजीनागर, बीड जिल्ह्यांमध्ये उष्ण आणी दमट हवामान राहील. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि सातारा येथे तापमान 33 ते 36 अंशांपर्यंत पोहोचेल. पुण्यात विशेषतः दुपारी उष्णता तीव्र असेल. काही ठिकाणी सायंकाळी हलके ढग दिसू शकतात, पण पावसाची अपेक्षा नाही. आर्द्रता तुलनेने कमी असेल. (हेही वाचा: India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज)

मुंबई हवामान अपडेट-

मराठवाड्यातही असेच चित्र असेल. औरंगाबाद आणि जालना येथे तापमान 34 ते 37 अंशांपर्यंत जाईल, आणि गरमीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. या भागात पावसाचा मागमूस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या नियोजनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. पुढे 17 एप्रिलनंतर, मुंबई आणि कोकणात उष्णता आणि दमटपणा कायम राहील, तापमान 34 अंशांपर्यंत जाऊ शकते. पुढील तीन ते चार दिवस कोणताही इशारा देण्यात आला नसून, तापमान स्थिर व हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे.