
महाराष्ट्रात सध्या जोरदार मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात 20 ते 24 मे 2025 दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा या भागांमध्ये अतिमूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये 21 मे पासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. अशात महाराष्ट्र आणि गोवाजवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे आणि 24 मे पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही.
यावेळी हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.
21 आणि 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला राहील, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील. तर 22 ते 24 दरम्यान रत्नागिरी, मुंबई, आणि पालघर जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो. मासेमारांनी तसेच नागरिकांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे, आणि स्वतःच्या सुरक्षितेसाठी 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्रातील खोल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा: Mumbai Traffic Update: मुंबई येथे अंधेरी सबवेवर पाणी, दक्षिण-उत्तर दोन्ही वाहिनीवरील वाहतूक बंद)
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 50-60 किमी/तास वेगाने वाहणारे वारे अपेक्षित आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हा पाऊस अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि पश्चिमी विक्षोभामुळे होत आहे, ज्यामुळे मे 2025 हा गेल्या दशकातील सर्वात पावसाळी मे ठरू शकतो.