Maharashtra Weather Forecast: मतदारांनो काळजी घ्या, राज्यात तुफान पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Weather Forecast: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच राज्यात पावसाचा इशारा(Rain Alert) देण्यात आला आहे. यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज हवामान खात्याने(Weather Department) वर्तवला आहे. (हेही वाचा:IMD Weather Update: महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस, गारपीट, तर कुठे वादळी वारे, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी देण्यात आला आहे. याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

आज दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार आहे. हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.