Image For Representations (Photo Credits - PTI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात (Maharashtra Temperature) मोठी घसरण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात थंडीची लाट सुरू आहे. मुंबईतील किमान तापमानात घट झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. आता आज म्हणजेच 11 जानेवारीलाही थंडीच्या झळा जाणवणार आहेत. शक्यतो उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह पुणे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या लगतच्या भागांमध्ये 10 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमान असणार आहे. उर्वरित भागात सुमारे 12 डिग्री सेल्सियस असू शकते. मुंबई आसपासचे कोकण परिसरात साधारण 16-18 डिग्रीच्या आसपास तापमान राहील.

दुसरीकडे, मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील अनेक भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबई आणि कोकणातील किमान तापमान सरासरीइतकेच राहील, असा अंदाज आहे. 10 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी हळूहळू घट होईल. राज्यात, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याला लागून असलेला काही भाग, तसेच विदर्भाच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

(हेही वाचा: कानपूरमध्ये भीषण थंडी! एका आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने तब्बल 114 जणांचा मृत्यू- Reports)

विदर्भ आणि खान्देशातील बहुतांश भागात किमान तापमानात 4 ते 6 अंशांची घसरण झाली आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगावसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पारा घसरला असून, त्यामुळे थंडी आणखीनच वाढली आहे. मुंबईसह कोकण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील आणि काही प्रमाणातच थंडी जाणवेल. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांतील सर्वात कमी 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यावेळी परभणीत 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे गरीब आणि बेघर लोकांचे हाल होत आहेत. गहू, हरभरा यासह उभ्या असलेल्या रब्बी पिकांना या थंडीत फायदा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.