Maharashtra Weather Forecast: 4 ऑक्टोबर पर्यंत  मुंबई, ठाणे सह कोकण, मध्य महाराष्ट्र भागात गडगडाटासह पावसाची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरू झाली आहे. मात्र या दरम्यानही 2 ते 4 ऑक्तोबरमध्ये महाराष्ट्रात मुंबई, ठाणे सह पश्चिम किनारपट्टीवरील कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज (2 ऑक्टोबर) मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यंदा अपेक्षापेक्षा जास्त पाऊस बरसला आहे. सुरूवातीला दिलासादायक वाटलेला हा पाऊस नंतर अवकाळी बर्सल्याने महाराष्ट्राच्या काही भागात तरारलेलं पीक पावसाने आडवं केलं आहे. यामध्ये अनेक धान्यांच्या पीकांचं तसेच फळांचं नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होईल. त्यामुळे आता 4 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होणार असून त्याबाबत नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन मुंबई वेधशाळेकडून करण्यात आले आहे. सोबतच शेतकरी आणि नागरिकांनी वीजेच्या कडकडाटाबाबत अलर्ट्स मिळवण्यासाठी दामिनी अ‍ॅपचा वापर करावा असं आवाहन देखील के.एस.होसाळीकर यांनी केलं आहे.

के.एस.होसाळीकर यांचे ट्वीट

मुंबई सह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे. सारी धरणं, तलावं भरलेली आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रावरून सुक्या दुष्काळाचं संकट टळलं आहे. ही दिलासादायक बाब असली तरीही ओल्या दुष्काळामुळे यंदा काही शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.