Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बंगालच्या उपसागरामध्ये (Bay Of Bangal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातही (Maharashtra) जाणवणार आहे. सध्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या म्हणजेच 5 आणि 6 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये कोकणात प्रामुख्याने पाऊस बरसू शकतो असा हवामान खात्याचा (IMD) अंदाज आहे.

आज महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर मंगळवार 7 सप्टेंबर दिवशी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. कोकणासोबतच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंग़ाबाद, जालना, हिंगोली,नांदेड,लातूर मध्येही ऑरेंज अलर्ट आहे. महाराष्ट्रात अनेक भागात काल (4 सप्टेंबर) संध्याकाळपासूनच पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. काल मुंबई नजिक ठाणे, डोंबिवली मध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रविवारपासून (5 सप्टेंबर) मंगळवारपर्यंत (7 सप्टेंबर), तर रत्नागिरी जिल्ह्याला बुधवारपर्यंत (8 सप्टेंबर) ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये सोमवार (6 सप्टेंबर) ते बुधवार (8 सप्टेंबर) पर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे येथे काही ठिकाणी मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात मंगळवारी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. पुणे आणि साताऱ्यात बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.