राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला, मात्र पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात अजूनही सूर्य आग ओकत आहे. महाराष्ट्रातील उद्याचे हवामान पाहता, अनेक ठिकाणी हवामान उष्ण असेल आणि तापमान 30-35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. दरम्यान मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे अलीकडच्या आठवड्यातील उच्च तापमानापासून दिलासा मिळू शकतो.
मुंबईत 10-11 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा वेळेच्या आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. मुंबईकरांना देखील बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला.. तापमानात घट झाली असली तरी आता पुढील तीन- चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान 48 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचंही दिसून आलं. दरम्यान, दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.