Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. पण नागरिकांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्यास मनाई केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याच येत आहे. याच पार्श्वभुमीवर वाधवान परिवाराने अन्य 23 जणांनी मुंबईहून महाबळेश्वरचा प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता लॉकडाउनचे उल्लंघन केल्याने वाधवान परिवारासह अन्य 23 जणांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

डीएचएफएलचे कपिव वाधवान यांच्यासह 23 जणांनी सुट्टी घालवण्यासाठी महाबळेश्वर येथे प्रवास केला. वाधवान कुटुंबियांच्या प्रवासासाठी गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे. तसेच आयपीएस कलम 188,269,270,34 आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. वाधवान परिवाराला प्रवासासाठी परवानगी दिल्याने आता राजकरण तापले असून भाजपने अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे.(लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र)

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तातडीने फोनवरुन चर्चा केल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या सुट्टीवर रहावे लागणार आहे. तर वाधवान परिवाराच्या विरोधात महाबळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीच्या एका रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.