
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून लसीकरणही (Vaccination) वेगाने सुरु आहे. यामुळेच अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र लोकल (Local), मॉल्स (Malls) आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसींचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. परंतु, दिवाळीनंतर लसीकरणासंदर्भातील हे नियम काहीसे शिथिल करण्याचा राज्य सरकराचा विचार आहे. याविषयीचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालनामध्ये पत्रकारांशी बोलातना दिले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले की, "दसरा झाला. आता दिवाळीचा मोठा सण येऊ घातला आहे. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होते. मंदिरं, चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय का आणि त्याचे प्रमाण कसे आहे, याचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर कोरोना निर्बंधातून सूट देण्याचा विचार करण्यात येईल. याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील." (भारतातील COVID Vaccination चे वर्ल्ड बँकेकडून कौतुक)
पुढे ते म्हणाले की, "कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्ण कमी झाले तर लसीचा केवळ एकच डोस घेतलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागातील तज्ञांशी चर्चा करुन सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जावू शकतो." परंतु, दिवाळीनंतरच्या सकारात्मक रुग्णसंख्येवर यासंदर्भातील अंतिम निर्णय अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल, मॉल्समध्ये प्रवेश मिळत आहेत. मात्र शाळा, महाविद्यालयं सुरु होणार असल्याने 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना देखील लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याने बाजारपेठा, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स, मंदिरं सुरु करण्यात आली आहेत. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसल्याने काही नियम लागू करण्यात आले आहेत.