Devendra Fadnavis & CM Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

राज्यात उद्यापासून 5 टप्प्यांत अनलॉकिंगची प्रक्रीया सुरु होणार असल्याची घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. त्यानंतर तासाभरातच अनलॉकचा प्रस्ताव विचारधीन असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यावरुनच विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अनलॉकबाबतच्या गोंधळावरुन सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "काय सुरू, काय बंद ? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक?पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद?" (Maharashtra Unlock Update: राज्यातील निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत; अनलॉकबाबत राज्य सरकारचं स्पष्टीकरण)

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हे सरकार आहे की सर्कस? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

अतुल भातखळकर ट्विट

मनसेने देखील यावरुन मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णया मुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत. काही कळत की नाही तुम्हाला वा...," असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होणार असून हिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्हे येत असून उद्यापासून त्यांच्या अनलॉकिंग प्रक्रीयेला सुरुवात होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्यानंतर काही वेळातच राज्य सरकारकडून अनलॉकबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी पुन्हा आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.