महाराष्ट्रात आज नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 99 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 65 हजारांच्या पार
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात थांबण्यासह नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात आज नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तसेच 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 65,168 वर पोहचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. याबााबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने आतापासून तयारी सुरु केली असल्याचे ही सांगण्यात आले आहे. कोरोनाचा वेग संथ झाला असला तरीही त्याची साखळी तुटलेली नाही हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.(मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाल्याने COVID19 रुग्णांचा आकडा 1733 वर पोहचला)

दरम्यान, देशात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचा निर्णय गृहमंत्रालयाने जाहीर केला आहे. तर राज्यात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. परंतु त्यानंतरच्या लॉकडाऊन बाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.