Navi Mumbai Rape: धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाला अटक, नवी मुंबई येथील घटना
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या (Maharashtra) नवी मुंबई (Navi Mumbai) येथून सर्वांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरूणाने शेजारच्या 7 वर्षीय मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा एकमेकांच्या शेजारी राहतात. दरम्यान, पीडित मुलीला एका लग्नाला घेऊन जात असल्याचे सांगत आरोपीने रबाळेच्या चिंचपाडा भागात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 24 जून रोजी रात्री घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच या घटनेनंतर शुक्रवारी आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या विचारात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिताआणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Bank of Baroda: मास्क घातला नाही म्हणून ग्राहकाला झाडली गोळी, बॅंक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकाला अटक

देशात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी जळगाव येथे शिक्षणासाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सलग 7 महिने अत्याचार सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी पीडिताची मावशी, काका आणि मामाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.