महाराष्ट्रामध्ये सध्या जुन्या पेंशनला (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीवरील राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी 14 मार्च पासून संपावर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. सुमारे 18 लाख कर्मचारी राज्यात संपावर गेल्यावर अनेक महत्त्वाच्या कामांचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. पण या संपामुळे उद्याच्या पेपरचं काय होणार? ही धास्ती तुमच्याही मनात असेल तर चिंता करू नका. बोर्डाने 14 मार्च दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (राज्य मंडळ) कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळातील कर्मचाऱ्यांकडून संपाला पाठिंबा देण्यात आला आहे पण कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनात सध्या कोणताही बदल झालेला नाही. वेळापत्रकानुसार मंगळवारी अर्थात 14 मार्च दिवशी परीक्षा पार पडणार आहे. नक्की वाचा: HSC Exams 2023: विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका; इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण .
मुख्यमंत्री, उपमुख्यांनी सरकारी कर्मचार्यांना संप मागे घेण्याचा आवाहन केले आहे. दरम्यान प्रशासनाने संपावर जाणार्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय पेन्शन स्कीम रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांची मागणी आहे. त्यासाठी उद्यापासून बेमुदत संप करण्याच्या तयारीत कर्मचारी आहेत. आजच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कर्मचार्यांनी संपाचे अस्त्र उगारले आहे.