Maharashtra Schools: 'महाराष्ट्रात दिवाळीच्या आधी शाळा सुरु होणार नाहीत'- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गा दरम्यान वाढत असलेली प्रकरणे पाहता, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले की, राज्यात दिवाळीच्या (Diwali) आधी शाळा सुरु होणार नाहीत. महाराष्ट्रात आतापर्यंत संक्रमणाची संख्या 15,17,434 झाली असून, कोरोना विषाणूमुळे 40,040 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 16 मार्चपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. सरकारने आता 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात शाळा सुरु होणार नाहीत.

यासंदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘सध्या शाळा ऑनलाईन वर्ग चालवित आहेत आणि काही भागात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गही आयोजित करत आहेत. आम्ही विविध पर्यायांचा शोध घेत आहोत, पण दिवाळीपूर्वी शाळा उघडणार नाहीत हे स्पष्ट आहे.’ राज्याच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण साथीचा रोग इतक्यात आटोक्यात येण्याची आशा नाही. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘संसर्ग नियंत्रित होईपर्यंत विभाग महाविद्यालय सुरू करण्यास पाठिंबा देत नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती भयानक आहे, कारण त्यांचे भविष्य आपल्या निर्णयावर अवलंबून आहे.’ शैक्षणिक नुकसानीबाबत पालकांच्या चिंतेची दखल घेता यावी म्हणून, राज्य सरकार दोन किंवा तीन शैक्षणिक वर्षे एकत्र क्लब करू शकेल, अशी सूचना शिक्षण तज्ञ किशोर दराक यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यावश्यक असली, तरी राज्य सरकारने याबाबत काही तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी पुन्हा वाढू शकते कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये दररोज होणारी वाढ घटत असली तरी, दिवाळीच्या सणावेळी पुन्हा ही संख्या वाढू शकते असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.