Maharashtra School Reopen: राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने लॉकडाउनचे सुद्धा निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात आता शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. या बद्दल पुढील आठवड्यात एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. सध्या 8-12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मात्र अन्य वर्ग लवकरच सुरु केले जातील असे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र त्या आता लवकरच सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जुलै पासून राज्यात किती शाळा सुरु करण्यात येणार याबद्दल सांगितले होते. त्यानंतर गायकवाड यांनी जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली याची माहिती ट्विट करत दिली होती. राज्यात जवळजवळ 19997 शाळा असून त्यापैकी 5947 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.(Maharashtra: राज्यात महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती)
दरम्यान, ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा या ठिकाणी एकही शाळा सुरु झालेल्या नाहीत. मात्र कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती दिली होती. मात्र काही पालकांनी कोरोनाची परिस्थिती पाहता भीती व्यक्त केली होती.
दरम्यान, एकूणच शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याबद्दल पुढील 8 दिवसात निर्णय होईल असे ही उदय सामंत यांनी असे म्हटले आहे. परंतु विविध जिल्ह्यात अद्याप कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भातील निष्कर्ष सुद्धा वेगळे असतील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.