महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ: पाच दिवसात गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे अजीत पवार, हसन मुश्रीफ, मधू चव्हाण अडचणीत
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

Maharashtra Rajya Sahakari Bank Fraud: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच दिवसात गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च न्यायालाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि मधू चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, राज्य सहकाही बँक (Maharashtra Rajya Sahakari Bank) घोटाळा प्रकरणात एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या 50 जणांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, हसन मुश्रीफ, मधू चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि इतर मंडळींचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

सन 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यामध्ये अनेक बड्या राजयीक नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही इतर पक्षातील लोकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा या प्रकरणी न्यायालयत याचिका दाखल करण्यात आली होती. आज (गुरुवार, 22 ऑगस्ट 2019) या याचिकेवर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने निर्णय दिला. महत्त्वाचे म्हणजे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठानं आपला निकाल यापूरवी राखून ठेवलेला होता. जो आज जाहीर केला. या निकालात घोटाळ्याी संबंधीत सर्व आरोपांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे असे स्पष्ट निर्देश दिले.