राज्यभर पावसाच्या थैमानानंतर अनेक ठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या सांगली (Sangali), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) मध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे (Pune) आणि रायगड (Raigad) येथील पाच तालुक्यात सुद्धा शैक्षणिक संस्थांना सुरक्षेच्या कारणास्तव सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील पाच दिवसात या परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे संबंधित भागातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत अडकलेल्या तब्बल दहा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते तर कोल्हापूर मधून 9 हजार लोकांचे स्थलांतरण केले होते.
दरम्यान, कोल्हापूरात मागील 30 वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे ज्यामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, तसेच राधानगरी धरणावरही पाण्याची पातळी वाढल्याने वीज निर्मिती थांबली होती. पावसामुळे अनेक महामार्ग बंद झाल्याने दूध संकलनावरही परिणाम झाला आहे, परिणामी दूध उत्पादकांना त्याचा फटका बसत असल्याचं समोर आलं आहे
कोल्हापूर व सोबतच्या परिसरातील याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मुंबईत मंत्रिमंडळाची एक खास बैठक घेणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे कोल्हापूर व सांगली विभागात पुरामुळे झालेल्या अवस्थेवर चर्चा होणार आहे.