नागपुरात (Nagpur) गेल्या 72 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने केवळ शहरातच नव्हे तर विदर्भात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. पावसाळ्याच्या एका महिन्यात, नागपुरात आतापर्यंत 314.9 मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीपेक्षा 14% जास्त आहे.
सोमवारी नागपुरात 39.6 मिमी पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी गडचिरोली जिल्ह्यासाठी 11 आणि 12 जुलैसाठी 'रेड अलर्ट' जारी केला होता, तर पुढील दोन दिवस नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि वाशिमसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. नागपूर टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
आयएमडीने पुढील 24 तासात विदर्भासाठी फ्लॅश फ्लड रिस्क (FFR) स्टेटमेंट देखील जारी केले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 'येत्या 24 तासात पुढील काळात पूर्व विदर्भ, दक्षिण विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, सौराष्ट्र आणि कच्छ, दक्षिण गुजरात प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर तेलंगणातील काही पाणलोट आणि शेजारच्या भागांमध्ये फ्लॅश फ्लडचा मध्यम धोका संभवतो.'
नागपुरात तैनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची प्रत्येकी एक टीम पूर सारखी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. गेल्या महिनाभरात नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू झाला, नाल्यात 2 जण वाहून गेले आणि एकाचा इमारत कोसळून मृत्यू झाला आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 353 लोकांना एसडीआरएफने सुरक्षित स्थळी हलवले. मात्र, गडचिरोलीतील पूरस्थितीमुळे महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Mumbai Rain Updates: मुंबईत रेड, ऑरेंज अलर्ट; समुद्रालाही उधान, किनारपट्टीवर जाण्यास बंदी, मुंबई महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना)
गेल्या 24 तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक 117.2 मिमी पाऊस पडला असून, त्याखालोखाल चंद्रपूर (83.4 मिमी), गडचिरोली (82.2 मिमी), गोंदिया (59.8 मिमी), वर्धा (38.6 मिमी), अमरावती (27.8 मिमी), ब्रम्हपुरी (27 मिमी), यवतमाळ (12 मिमी), अकोला (5.2 मिमी) आणि बुलढाणा (4 मिमी) पाऊस पडला. पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.