Seaside Mumbai | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबईतही असाच पाऊस संततधार (Mumbai Rain Updates) कोसळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. एका बाजूला पावसाची संततधार आणि दुसऱ्या बाजूला समुद्राला आलेले उधान पाहता महापालिकेने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने शहराला दिलेला रेड आणि ऑरेंज अलर्ट लक्षात घेऊन पालिकेने नागरिकांन समुद्रकिनारपट्टीवर (Seaside) जाण्यास प्रतिबंद केला आहे.

मुंबईच्या समुद्रात आज 4.47 मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. दुपारनंतर लाटांचे उधान काहीसे उतरण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तरीही सावधगिरी म्हणून मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांकडे न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, नागरिकांनी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या कालवाधीतच समुद्र किनारपट्टीवर जावे. सकाळचे केवळ चार तासच नागरिकांना समुद्रकिनारपट्टीवर जाण्यास परवानगी असेल. इतर वेळी नागरिकांनी किनारपट्टीवर फिरू नये, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast Update: मुंबई, ठाणे, पुणे सह हिंगोली, लातूर मध्ये पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचे; IMD Mumbai चा अंदाज)

प्राप्त आकडेवारीनुसार यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू समुद्रात बुडून झाला आहे. त्यामुळे समुद्रात बुडून होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढू नये यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासनाने अवाहन केले आहे की, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच, समुद्र किनारपट्टीवरही जाऊ नये.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी बसवलेल्या उपकरणांनी थेट पाणी उपसा करण्यासही सुरुवात झाली आहे. दरम्यान, साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.