Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात मान्सूनचे आगमन हे उशीरा झाल्यामुळे अनेक शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबळ्या आहेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - IMD Weather Forecast: पालघर, रायगडसाठी Red Alert, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट)

कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.  मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा लागल्यानंतर  जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच जोरदारपणे पावसानं हजेरी लावली.   हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला.नांदेडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या मोसमातील पहिलाच दमदार पाऊस नांदेडमध्ये झाला. या पावसाने जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. वर्ध्यातही संततधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र नदी नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहेत. वर्ध्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला असून आनंदाचे वातावरण आहे.