राज्यात उशीरा सुरु झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह पुण्यामध्येही गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसाचा हाच जोर कायम राहणार असून जुलै महिन्याची सुरूवातही पावसानेच होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. (हेही वाचा -Mumbai Weather Forecast: मुंबई, ठाणे, पालघर मध्ये पुढील 3-4 तास मुसळधार कोसळण्याची शक्यता- IMD)
आठवडाभरापासून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अद्याप राज्यातील काही भागांत पावसाने म्हणावा तसा जोर धरला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आज पावसाचा अंदाज आहे.
संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामध्ये सरासरी 94 ते 106 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं आहे. दरम्यान, पहिल्याच पावसानंतर आता कृषी केंद्रांवरही खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी शेतक-यांची गर्दी दिसून येतेय. मात्र काही भागात पाऊस कमी झाल्याने बळीराजा अद्याप चिंतेत आहे.