Maharashtra Rain Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यभर कोसळणार मुसळधार सरी; IMD चा अंदाज
Representational Image | (Photo Credits: PTI)

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासूनच पावसाने राज्यभर चांगली हजेरी लावली आहे. पुढील 4-5 दिवस हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay Of Bangal)  कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत आहे. परिणामी राज्यभर मुसळधार सरी बरसणार आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे.

मुंबईत काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पुढील 5 दिवस पावसाचे असणार आहेत. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

K S Hosalikar Tweet:

8 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवस हा जोर कायम राहणार असून उत्तर मराठवाड्यात 7 ते सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मागील 3-4 दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. हा जोर काही दिवस कायम राहणार असून विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.