राज्यात लवकरच 3,064 प्राध्यापकांची भरती (Professors Recruitment) होणार असल्याची माहिती महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज दिली. आज ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. 21 जूनपासून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक उमेदवार भरतीसाठी आंदोलन करीत आहेत. आता आज मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांनी आपला निषेध मागे घेतला आहे. सरकारच्या वतीने एकूण 4,074 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1,0674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे.
मात्र सध्याच्या कोरोना महामारीमुळे 3,064 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती थांबली होती, ती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या मंत्रालयाकडून 3,064 प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तो अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरतीसंदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल.
आजच्या बैठकीमध्ये, 2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन 700 पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 2020 या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत याबाबतच दोन महिन्यात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने 48 मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीएचबी संदर्भात निर्णय घेण्यासाठी संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. (हेही वाचा: Mumbai Local Update: बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप; Universal Travel Pass चं सरकारचं नियोजन)
यासोबत, महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यापीठातील ग्रंथपाल भरतीसंदर्भात केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील शिक्षकीय 659 भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.