Maharashtra Politics: 'एकनाथ शिंदेच राहणार राज्याचे मुख्यमंत्री', अफवांच्या पार्श्वभूमीवर DCM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण (Watch Video)
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच यापुढेही मुख्यमंत्री राहतील’, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी दिले. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या अफवा राज्याच्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांना शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे पहिल्यापासूनच माहीत असल्याचा खुलासाही फडणवीस यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये संभाव्य बदलाची चर्चा सुरू होती. सीएम शिंदे यांना बाजूला सारून पवारांना मुख्यमंत्री बनवण्याच्या उद्देशाने भाजपने अजित पवारांशी युती केल्याचे काहींचे मत आहे. मात्र, या अफवांवर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाच्या नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या हिताचे असू शकते. सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री सत्तेत आहेत. उद्या भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री हवा असेल आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असेल, यात काहीही चुकीचे नाही.’

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्रिपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही तेच राहतील. अजित पवार यांच्या वाढदिवसादिवशी, त्यांच्या समर्थकांनी राज्याचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे स्वागत करणारे बॅनर आणि टीव्ही जाहिरातींनी खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बाहेरही असेच पोस्टर्स लावण्यात आले होते. (हेही वाचा: मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका का फोडला? अमित ठाकरे यांनी सांगितला किस्सा)

इतकेच नाही तर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केलेल्या एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी लिहिले आहे की, ‘मी अजित अनंतराव पवार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच.’ या घडामोडींच्या दरम्यान शिंदे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. एका आठवड्यात मोदींसोबतची त्यांची दुसरी भेट आणि एका महिन्यात हा त्यांचा पाचवा दिल्ली दौरा ठरला.