शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा आमदारांना साद घातली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरच्य माध्यमातून शिवसेना आमदारांना भावनिक साद (Sanjay Raut's Appeal to Shiv Sena) घातली आहे. ही साद घालताना त्यांनी म्हटले आहे की, ''चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!'' संजय राऊत यांनी दुपारीच एक विधान केले होते. ज्यामुळे महाविकासआघाडीतही चलबिचल निर्माण झाली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून आमदारांना अवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेत नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी दुपारी बोलताना आमदारांना अवाहन करत म्हटले होते की, 'मुंबईत या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटा. शिवसेना मविआतून बाहेर पडण्याबाबत विचार करेन. फक्त पुढच्या 24 तासात मुंबईत या. मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट बोला. बाहेरुन पत्रं पाठवू नका, आपण जे बोलतो आहे ते जबाबदारीने आणि अधिकृतपणे बोलतो आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. शिवसेना आमदार कैलास पाटील (Shiv Sena MLA Kailas Patil) आणि नितीन देशमुख यांची एक संयुक्त पत्रकार परिषद आज (23 जून) मुंबई येथे पार पडली. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: सुरतेहून सुटका, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदार कैलास पाटील यांचा धक्कादायक अनुभव, त्यांच्याच शब्दात जसाच्या तसा)
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानानंतर पुढच्या काहीच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची प्रतिक्रिया आली. संजय राऊत यांच्या विधानावर मी पक्षाची भूमिका मांडणार नाही. त्यासाठी आम्हाला चर्चा करावी लागेल. मात्र, माझे व्यक्तीगत मत मी व्यक्त करेन. पृथ्वीराज चव्हाण यानी म्हटले की, संजय राऊत यांनी मविआतून बाहेर पडेल म्हटले. पण, ते बाहेर पडून काय करणार आहेत. ते भाजपसोबत जाणार आहेत का? मुळात आम्हाला सध्या हेच कळत नाही की, शिवसेना नेमकी कोणाची आहे. शिवसेनेत सध्या कोणाचे नेतृत्व आहे. तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. पण, आम्हाला हे लक्षातच येत नाही काय चालले आहे. मुळात तसे आमच्याही हातात काहीच नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेनेनेच घ्यायचा आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानापूर्वी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची साथ देईल. आम्ही महाविकासआघाडी सरकार टीकविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. ट्विटरच्या माध्यमातूनही भूमिका व्यक्त करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, 'महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.'