Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या 35 बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला असून सरकार पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले.

एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकीकडे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करायला गुजरातमध्ये पोहोचले असून, दुसरीकडे शिवसेनेने हे मोठे पाऊल उचलले आहे. परंतु आता अहवालानुसार माहिती मिळत आहे की, एकनाथ शिंदे आपणच गटनेते पदावर कायम राहणार असल्यावर ठाम आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या मते शिवसेनेच्या बैठकीमध्ये अवघे 16 आमदार उपस्थित होते तर आपल्याकडे 35 आमदार आहेत. ज्याच्याकडे जास्त आमदार असतात तोच गटनेता बनू शकतो त्यामुळे आपणच गटनेते राहणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणत आहेत.

शिंदे यांच्या मते आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने आपल्याला गटनेते पदावरून हटवले जाऊ शकत नाही. अशाप्रकारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा गटनेते पद सोडण्यास नकार असल्याची बातमी मिळते आहे. यासोबतच आज संध्याकाळपर्यंत शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात असेही वृत्त आहे. (हेही वाचा: मविआ सरकार कोसळले तर? शरद पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य)

दुसरीकडे, शिवसेनेने शिंदे यांची विधीमंडळाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदे यांनी ट्वीट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'.