
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार अद्याप तरी स्थिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी महाविकासआघाडीतून शिवसेना बाहेर पडू शकते, असे विधान का केले त्यांचे त्यांना माहिती, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, खासदार आण वरिष्ठ नेत्यांची एक बैठक आज सायंकाळी मुंबई येथे पार पडली. ही बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यानंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेतील बंडखोरी हा शिवसेनाचा अंतर्गत मुद्दा आहे. सध्यातरी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा त्यात प्रवेश झाल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे या बंडामागे भाजप असल्याचे सध्या तरी दिसत नाही. परंतू, एक नक्की आहे. शिवसेनेत जेव्हा बंडखोरी होते तेव्हा नेते बाजूला जातात. शिवसैनिक जागेवरच राहतात. आजवर जेवढी बंडं शिवसेनेत झाली त्यातून हेच दिसले आहे. कधी कधी बंड करणारा नेता थोडाफार टीकतो. परंतू, त्यांचे सहकारी पुन्हा निवडूनही येत नाहीत. शिवसैनिक कट्टर असतात आणि जेव्हा बंड होते तेव्हा ते अधिक कट्टर होऊन काम करतात हा इतिहास असल्याचेही अजित पवार म्हणाले.
शिवसेना बंडखोर आणि काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेले पक्षपातीपणाचे आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावले. अर्थमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून कधीही पक्षपातीपणा केला नाही. सर्वांना ठरलेला निश्चीत निधी दिला. कोणत्याही प्रकारे निधीला कात्री लावली नाही. कोणत्याही आमदाराचा निधी कमी केला नाही. त्यामुळे निधीवाटपात पक्षपातीपणा केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे, असेही अजित पवार म्हटले.