राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राजकीय संघर्ष निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दारापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करणारी अजित पवार यांची याचिका निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील जयंत पाटील यांनी 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याची याचिकाही आयोगाला प्राप्त झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी 30 जून रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा करणारे एक अप्रसिद्ध पत्र देखील आयोगाला प्राप्त झाले आहे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ 40 हून अधिक आमदार आणि खासदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत. निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, शरद पवार गटाने आयोगापुढे याचिका दाखल केली असून, या पक्ष व पक्ष चिन्हाबाबत कोणतेही निर्देश देण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती केली आहे.
अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह तेच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांनीही तेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत याचिकांवर प्रक्रिया करेल. (हेही वाचा: Maharashtra Political Crisis: 'विश्वासघातकांनी परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नये', राष्ट्रवादीचे संस्थापक Sharad Pawar यांचा इशारा)
दरम्यान, रविवारी 40 हून अधिक आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत अजित पवार महाराष्ट्रातील शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारमध्ये सामील झाले व पक्षात फूट पडली. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली होती. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शपथ घेतली.