Sharad Pawar | (Photo Credit : ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेलेल महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच पुढे कायम राहिल, हे देश पाहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. जे शिवसेना (Shiv Sena) आमदार महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यांना महाराष्ट्रात यावेच लागेल. ते महाराष्ट्राच्या विधिमंडळ प्रांगणात आल्यानंतर त्यांना गुजरात किंवा असमचे भाजप नेते मार्गदर्शन करण्यास येणार नाहीत. महाराष्ट्रातील भाजप नेतेही त्यांना मार्गदर्शन करणार नाहीत, असे स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी म्हटले.

शिवसेना आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, अजित पवार हे केवळ महाराष्ट्रातील परिस्थितीवर आधारीत बोलले. महाराष्ट्राबाहेरील परिस्थिती आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेना बंडखोर आमदारांना मदत करणारे घटक अथवा जे लोक आहेत ते अजित पवार यांच्या परिचयाचे असण्याची शक्यता नाही. परंतू, ते सर्व माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती आहे या पाठीमागे कोण आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच पुढे आलेल्या एका व्हिडिओतील विधानाचा दाखला देत शरद पवार म्हणाले, व्हिडिओत दिसते की एकनाथ शंदे म्हणत आहेत की आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाची मदत आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांची यादी माझ्याकडे आहे. शरद पवार यांनी या वेळी ती यादीही वाचून दाखवली. यात राष्ट्रीय पक्ष म्हणून केवळ भाजप, काँग्रेस (सोनिया गांधी), सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस इतक्याच पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे कोणाचे नाव घ्यायची गरज नाही. आपण सहज विचार जरी केला तरी आपल्या लक्षात येईल, शिवसेना बंडखोरांच्या पाठिमागे कोण आहे.

बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे. शिवसेना मविआतून बाहेर पडायला तयार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर बालताना शरद पवार यांनीही त्यावर भाष्य केले. संजय राऊत हे म्हणाले. पण त्यात ते असेही म्हणाले की, या आमदरांनी महाराष्ट्रात यावे. ते महाराष्ट्रात आले तरच त्यावर भाष्य करता येईल, असे शरद पवार म्हणाले. बंडखोर कितीही बाहेर राहिले तरी त्यांना विधिमंडळातच यावे लागेल, असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्यावर निधीवाटपात पक्षपात केल्याचा आरोप चुकीचा आहे. त्याला काहीही आधार नाही, असे शरद पवार म्हणाले.