Maharashtra Police Bharti 2024: पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करा; उमेदवारांची मागणी
Police Representative Image (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रामध्ये पोलिस भरतीची (Maharashtra Police Bharti) प्रक्रिया अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. यामध्ये वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी केली आहे. सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी मुंबई च्या आझाद मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन देखील केले आहे. कोरोना काळामध्ये भरती रखडल्याने पोलिस भरतीसाठी इच्छूक अनेक उमेदवार अडचणीमध्ये आहेत. त्यांना वयोमर्यादेत सूट देऊन समाविष्ट करून घेण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, कोरोना,सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत परिणामी भरती प्रक्रिया रखडली होती. आता वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या आहेत. वयोमर्यादेची अट खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी दोन ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. या अध्यादेशाचा आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठी देखील हाच नियम लागू करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. सोबतच मार्च 2024 पर्यंत वयोमर्यादेची अट शिथील करण्याची त्यांची मागणी पत्राद्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

6 मार्च पासून राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून 31 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. इथे पाहा सविस्तर: Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात मेगा पोलीस भरतीला सुरूवात; तब्बल १७ हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू .

31 डिसेंबरपूर्वी पोलिस भरतीची जाहिरात अपेक्षित होती मात्र या जाहिरातीला फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आले. या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळावा म्हणून 2022-23 च्या भरती प्रक्रियेसाठी 2021-22 नुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी अशी उमेदवारांची मागणी आहे.