Maharashtra New Chief Minister: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांची संमती; शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती
Uddhav Thackeray. (File Photo: IANS)

सत्ता स्थापनेसाठी (Maharashtra Government Formation) जवळजवळ एक महिना चाललेल्या चर्चेनंतर लवकरच महाराष्ट्राला नवीन सरकार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेची (NCP-Congress-Shiv Sena) महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती मिळाली. आता चर्चा सुरु झाली आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद (Chief Minister) कोणाकडे जाते याची. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या नावावर सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर दिली. त्यानंतर संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला संमती असल्याचे सांगितले आहे.

सध्या चालू असलेल्या घटना आहे त्याच मार्गाने गेल्या, तर महाराष्ट्राला ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री मिळू शकतो. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्येही भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती देण्यात आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनीही या गोष्टीला हिरवा कंदील दिला असून आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारू असे सांगितले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. अशाप्रकारे महाराष्ट्राला तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनचा मुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे, ती उद्या पुन्हा होणार आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (हेही वाचा: Maharashtra Government Formation: मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती- शरद पवार)

या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी आदि महत्वाची नेते मंडळी उपस्थित होते. याआधी मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत होते, मात्र राष्ट्रवादीकडून ते वयाने आणि अनुभवाने लहान असल्याचे सांगण्यात आले. अखेर ही माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडणार अशी चिन्हे आहेत.