कुश्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिकसाठी रोहित पवारांनी पुढे केला मदतीचा हात (Photo Credit: Twitter/Instagram)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील कुश्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिकसाठी (Sonali Kondiba Mandlik) मदतीचा हात पुढे केला आणि सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. सोनाली अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात कोपरेवाडी गावात राहते. सोनालीने 'खेलो इंडिया'च्या (Khelo India) कुश्ती स्पर्धेत दोनदा सुवर्णपदकाची कमाई केली आहे, तर इतर स्पर्धांमध्ये देखील उत्तम कामगिरी करत पदकं मिळवली आहेत. पण, घरातील परिस्तितीमुळे तिला पुढे जाण्याची संधी मिळत नव्हती. सध्या ती तिच्या घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव करते. पाच व्यक्तीचे कुटुंब आणि सर्वांची जबाबदारी एकट्या वडिलांवर आहे. अशा स्थितीत देखील तिचे वडील मुलीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करत आहेत. याबाबत सोशल मीडियाद्वारे रोहित पवार यांना माहिती मिळाली आणि तिच्या परिस्थितीची दाखल घेत त्यांनी सोनालीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. (कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईच्या डब्बेवाल्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढे केला मदतीचा हात; सामान्यांनाही निधी मध्ये मदत करण्यासाठी आवाहन)

रोहित पवारांनी ट्विटरवर जाऊन याबाबत माहिती दिली. रोहित यांनी लिहिले की, "सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझं बोलणंही झालं. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे." सोनाली सध्या कर्जतच्या महाविद्यालयाच 12वीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, रोहित यांच्या या निर्णयानंतर यूजर्सकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

सोनालीला आर्थिक मदत मिळाल्यास तिच्या स्वप्नांना उंच भरारी मिळेल आणि ती भारतासाठी पुढे जाऊन अनेक पदकं मिळवेल अशी आशा व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोनालीने कुश्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा असून स्वतः साठी घर नसताना ही गोठयात राहून खेळाची तयारी करून घेत आहेत.