महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन सुरू आहे. पुनश्च हरिओम म्हणत महाराष्ट्र सरकारने पुन्हा व्यवहार, उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र अजूनही नोकरदार वर्ग पूर्ण क्षमतेने कामावर आलेला नसल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. यामधील एक म्हणजे मुंबईचा डब्बेवाला. मुंबईकरांना डब्बे पोहचवण्यासाठी कधी सायकलवरून तर कधी मुंबई लोकल मधून प्रवास करणार्यांचा व्यवसाय सध्या ठप्प आहे.
कोरोनाच्या संकटकाळात आता मुंबईच्या डब्बेवाल्यांना मदत करण्यासाठी आमदार रोहित पवार पुढे आले आहेत. त्यांनी काल मुंबईच्या डब्बेवाल्यांची भेट घेतली असून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. आज रोहित पवारांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्याची माहिती देताना, ' मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा.' असं म्हटलं आहे.
मुंबईमध्ये चाकरमान्यांना डब्बे पोहचवण्याचं काम करणार्या मुंबईच्या डब्बेवाल्यांचं मॅनेजमेंट स्किल बड्या महासत्ता असणार्या देशातील मॅनेजमेंट स्कूलसाठी आदर्श आहे. लंडनच्या राजघराण्यातून प्रिंस चार्ल्स यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांचं काम समजून घेतलं आहे.
रोहित पवार ट्वीट
मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय.
आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा. pic.twitter.com/HqIAK5FQ2D
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 27, 2020
मुंबईचे पाच हजार डबेवाले दररोज सहा लाख चाकरमान्यांना डबा पोहोचवतात. दरम्यान विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी तसेच हार्बर मार्गावरही मुंबईचा डब्बेवाला लोकलने प्रवास करताना सामान्य मुंबईकरांनी पाहिला आहे. सध्या लोकल आणि मोठी ऑफिस बंद असल्याने डब्बेवाल्यांसमोर मोठी आर्थिक चणचण उभी राहिली आहे.