George Fernandes Passes Away: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे. जॉर्ज फर्नांडीस स (George Fernandes) यांचे रेखाटलेले व्यंगचित्र राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राला 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला अशी पंचलाईनही दिली आहे. कुर्ता, पायजमा आणि जाड कडांचा चष्मा ही जॉर्ज फर्नांडीस यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख राज यांनी आपल्या व्यंगचित्रात हुबेहुब रेखाटली आहे. शिवय हातात कागद घेऊन माईकसमोर उभे असलेले आणि त्वेशाने भाषण ठोकत असलेले जॉर्ज लक्ष वेधून घेतात. जॉर्ज यांच्या समोर राज यांनी व्यंगचित्रात दाखवलेला अर्धा तुटलेला माईक त्यांच्याविषयीची करुणा दाखवतो. राज यांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट करताच त्याला काही मिनिटांत हजारहून अधीक लाईक आले तर अनेकांनीह हे ट्विट रिट्विट केले आहे.
लढवय्या कामगार नेता अशी जॉर्ज फर्नांडीस यांची ओळख होती. साधी राहणी आणि दांडगा लोकसंपर्क, मराठी, हिंदी, इंग्रजी, तामीळ, कोंकणी यांसह सुमारे दहा भाषंवर प्रभूत्व आणि आपल्या आक्रमक भाषणाच्या जोरांवर विरोधकांवर प्रहार हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य. फर्नांडीस हे आपल्या भाषणातून नेहमीच कामगरांची बाजू मांडत आले. कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा संपाचे हत्यार उपसले. त्यांनी घोषणा केली तर, काही मिनिटांत मुंबईची नस समजली जाणारी लोकल ट्रेन काही मिनिटांत ठप्प व्हायची. त्यामुळे त्यांना 'बंद सम्राट' म्हणूनही ओळखले जायचे.
जॉर्ज फर्नांडीस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी दिल्ली येथील मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक वर्षे ते अल्जायमर या आजाराशी झुंज देत होते. अलिकडील काही दिवसात त्यांना स्वाईन फ्लू या आजाराचीही लागण झाली होती. आपल्या आयूष्यातील प्रदीर्घ काळ त्यांनी संसदीय राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. 1967 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते. ऑगस्ट 2009 ते जुलै 2010 हा त्यांच्या संसदीय राजकारणाचा शेवटचा काळ होता. त्यानंतर ते परत कधीच संसद सभागृहात दिसले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. (हेही वाचा, कामगार नेते, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन)
'सम्राट' कायमचा 'बंद' झाला . #GeorgeFernandes pic.twitter.com/7JHJdRJfPn
— Raj Thackeray (@RajThackeray) January 29, 2019
आयुष्यभर कामगार नेते राहिलेल्या फर्नांडीस यांच्यावर ते संरक्षणमंत्री असताना जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. आयुष्यभर साधी राहणी जगलेल्या फर्नांडीस यांच्यावर असा आरोप होणे हे त्यांच्या एकूण राजकारणाला हादरवून टाकणारे होते. पुढे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत न्ययालयानेच हे प्रकरण निकालात काढले. फर्नांडीस आरोपमुक्त झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.