महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी परतीचा पाऊस धूमशान घालत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 12 ऑक्टोबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी पिकांची काळजी घ्यावी. कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आज पुण्यात वादळी वारा सह पावसामुळे राज ठाकरे यांची प्रचाराची पहिली सभा रद्द झाली आहे.
वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अहमदनगर , पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.
नक्की वाचा: Pune Rains: पुण्यात तुफान पाऊस, अनेक भागांत साचले पाणी; Watch Videos
वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे