Monsoon Update (Photo Credits: Pixabay)

मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने (Monsoon) आता विश्रांती घेतली असून विदर्भात मात्र पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. मात्र 19 जुलै पासून म्हणजेच शुक्रवार संध्याकाळ पासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. लासूर, वैजापूर आणि पाचोडमधील काही भागात चांगला पाऊस झालाय. तर दुसरीकडे बीडच्या गेवराई तालुक्यात शुक्रवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या कित्येक दिवसापासून मराठवाड्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होता. मात्र शुक्रवारच्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे.

जालन्यात देखील पावसाने जोरदार सुरुवात केलीय. तर नागपूरातही पावसाने दमदार हजेरी लावली असून काल विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. सततच्या पावसाने येथील बळीराजाही सुखावला आहे. दुसरीकडे नगरच्या संगमनेर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शेतातील बांध वाहून गेले असून शेतक-यांची पिकेही पाण्याखाली गेलीत. दक्षिण कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस सुरू असून, वेंगुर्लामध्ये २४ तासांच्या कालावधीत १५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सोलापूरात मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी आजपासून पुढचे काही दिवस तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याची चाचणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून आजपासून सक्रिय- Skymet

तर मुंबईमध्ये मागील 2-3 आठवड्यापासून ठाण मांडून बसलेल्या तूर्तास विश्रांती घेतली असून मुंबईत झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईतील 10% पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. पाणीकपातीच्या निर्णयाने मुंबईकरही सध्या खूश आहेत.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, 20 ते 23 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर 23 जुलैपासून मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस 26 जुलै पर्यंत राहणे अपेक्षित आहे. दरम्यान या कालावधीत कोकण आणि गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.