Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

Monsoon 2019 Predictions: महाराष्ट्रसह देशभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली. मात्र महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भावर वरुणराजा अद्याप नाराज असल्याचे चित्र आहे. कोकणकिनारपट्टीसह इतर भागात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर विदर्भ-मराठवाड्याला देखील मान्सूनची प्रतीक्षा आहे. मात्र आजपासून म्हणजेच 19 जुलैपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बरसणार, असा दिलासादायक अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यात कोसळणाऱ्या पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्याचबरोबर मुंबईसह मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे विदर्भ-मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. आजपासून पाऊस सुरु झाल्यास पुढील 3-4 दिवसात तो चांगलाच जोर धरेल. (दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार का? राज्यातील जनतेला उत्सुकता)

मुंबईत कमी झालेला पाऊस 22 जुलैपर्यंत कमीच राहील. मात्र ठाणे, हडाणू या किनारी भागात पावसाची तीव्रता वाढेल. तर 23 आणि 26 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या उत्तर किनारी भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.