विधानपरिषद निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election 2022) आज (20 जून) मतदान पार पडत आहे. या मतदानाची मतमोजणीही आजच होणार आहे. त्यामुळे परीक्षेदिवशीच निकाल असाच काहीसा प्रकार आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडून जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी आम्हीच जिंकणार अशाच काहीशा प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, राज्यसभेतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलेल्या एका सूचक ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तसेच, 'तो' मिशीवाला मावळा कोण? अशीही विचारणा होऊ लागली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असल्याने सर्वांचेच टेन्शन आणखी वाढले आहे.
अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये महाविकासआघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा.' मजेशीर बाब अशी की महाविकासआघाडीने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांची मिशी आहे. तर काही बिनमिशीचे. त्यामुळे हा मिशिवाला उमेदवार नेमका आहे तरी कोण याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2022: मविआ विरुद्ध भाजपा; विधानपरिषदेसाठी रंगलेल्या सामन्याचा आज निकाल, सकाळपासून मतदान, सायंकाळी निकाल)
दरम्यान, बोंडे यांच्या ट्विटचा सूचक अर्थ काढणारे हे शिवसेना उमेदवार अमशा पडवी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. बोंडे यांनी ट्विटमध्ये केलेला 'मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा' उल्लेख. मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आहे तर शिवसेनेचेच उमेदवार असलेले आमशा पाडवी हे टोकदार मिशांसाठी ओळखले जातात. त्यांची ती स्टाईल आहे. त्यामुळे बोंडे यांचा रोख पाडवी यांच्याकडे तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, भाऊ आणि भाई यांचा उल्लेख हा एकनाथ खडसे आणि भाई जगताप यांच्याकडे असल्याचे स्पष्टच जाणवते. मात्र, तो मिशीवाला मावळा कोण याची मात्र जोरदार चर्चा आहे.
ट्विट
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा...#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने जोरदार रंगत आली आहे. परिणामी आपापले महत्त्वाचे उमेदवार सुरक्षीत करण्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रस्सीखेच आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संख्याबळाच्या जोरावर काही उमेदवार सहज निवडणून येणार असले तरी 10 व्या उमेदवारासाठी सर्वांनाच धाकधूक आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची सगळी मदार छोटे पक्ष आणि अपक्षांवर आहे.