अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा कोकण भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकण दौरा केला. यावेळी त्यांनी वादळग्रस्तांना तातडीने भरघोस नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज सरकारकडे केली होती. मात्र या दौऱ्यावरून राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “फडणवीसांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावे, महाराष्ट्रात कोरोनासाठी त्यांची आवश्यकता नाही”, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
नुकतीच हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. दरम्यान ते म्हणाले की, सत्ता गेल्याने फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. सत्ता पाडण्यासाठी दीड वर्षात त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र, अजूनही ते शांत बसलेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते चक्रीवादळाच्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. उत्तर प्रदेशात शेकडो कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेही गंगा किनारी पुरले गेले. गुजरात मध्ये तब्बल 71 हजार मृत्यू लपवण्यात आले. याव्यतिरिक्त गोव्यातही ऑक्सिजन अभावी 90 जणांनी प्राण गमावले आहेत. या तिनही राज्यांमध्ये झालेली मृत्युची लपवालपवी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यावर उपाययोजना करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून निवड करावी. तसेच त्यांना तिकडे पाठवावे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येत घट होत असून महाराष्ट्रात कोरोनासाठी त्यांची आवश्यकता नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- 'ब्रेक द चेन अंतर्गत' शिवभोजन थाळी येत्या 14 जून पर्यंत मोफत मिळणार, येथे पहा केंद्राची लिस्ट
तौक्ते चक्रीवादळानंतर आता महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच पंचनामे करुन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले आहे.