(Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) अशा कात्रीत सापडलेली महाराष्ट्र (Maharashtra) विधान परिषद निवडणूक 2020 (Legislative Council Election 2020) अखेर होऊ घातली आहे. येत्या 21 मे रोजी 9 रिक्त जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. मतसंख्येचा विचार करता विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष एकूण 4 जागा सहज निवडूण आणू शकतो. या चार जागांसाठी उमेदवारी मिळावी यासाठी भाजपमधून अनेक जण इच्छुक आहेत. यात एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde) आदी नेत्यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पक्ष जुन्या जेष्ठ नेत्यांना संधी देतो की, नव्या चेहऱ्यांचा शोध घेतो याबाबत उत्सुकता आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतांचे गणित पाहता एकूण नऊ जागांसाठी 9 उमेदवारांनीच उमेदवारी केली तर सर्वजण बिनविरोध निवडूण जाऊ शकतात. मतांच्या गणितानुसार ज्या उमेदवाराला 29 मते मिळू शकतात तो उमेदवार निवडूण येणार आहे. त्यामुळे ज्या पक्षाची मते अधिक त्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडूण येणार आहेत. विधानसभेत भाजपचे 105 सदस्य आहेत. मित्रपक्षांची साथ मिळाल्यास हे संख्याबळ 113 वर जाऊ शकते. त्यामुळे भाजपचे 4 उमेदवार निवडूण येणे सहज शक्य आहे.

दरम्यान, सुरक्षीतपणे निवडूण येणाऱ्या या 4 जागांसाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पक्षाने तिकीट कापलेले आणि काही पराभूत झालेले जेष्ठ नेते या जागांसाठी इच्छुक आहेत. यात एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन, मुंबईत भाजपचा वाढलेला विस्तार पाहता विनोद तावडे हेही इच्छुक आहेत. दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी देण्याबाबत पक्षाला विचार करावा लागणार आहे. विदर्भातील माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांना सांभाळून घेताना भाजप कोणाला संधी देतो याबाबत उत्सुकता आहे.