कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. यातच लसींच्या मर्यादीत साठ्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यावरुन पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केंद्राकडे लस (Vaccine) आणि ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्याची मागणी केली आहे. "45 वर्षांवरील सुमारे 4 लाखांहून अधिक नागरिक कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, आम्हाला कोवॅक्सिनचा पुरवठा होत नाहीये. जर आम्हाला लसींचा पुरवठा झाला नाही तर 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी देण्यात आलेल्या लसी 45 वर्षांवरील नागरिकांना द्याव्या लागतील," असे टोपे म्हणाले.
तसंच त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याची देखील मागणी केली आहे. "आम्हाला 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून केंद्र सरकारने आम्हाला त्याचा पुरवठा करावा. आम्हाला दोन दिवसांत 9 लाख लसी मिळाल्या असून आतापर्यंत 8 लाख लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक लसी केंद्राने द्याव्यात," अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
ANI Tweet:
Almost 4 lakh people of 45 yrs & above are waiting for their second dose. There is no supply of Covaxin & if we don't get the supply we have to transfer vaccines allotted to 18-44 yrs to 45 yrs & above age group: Rajesh Tope, Maharashtra Health Minister
— ANI (@ANI) May 7, 2021
कोविड-19 लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले आहे. राज्यात आतापर्यंत राज्यात 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 लसींचे डोस देण्यात आले असून त्यापैकी 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. दरम्यान, मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे लसींचा पुरवठा वाढल्यास लसीकरणाला वेग येईल. (अदर पूनावाला यांनी महाराष्ट्राला लस देण्यात काहीसं झुकतं माप द्यावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे)
कालच्या अपडेटनुसार, राज्यात 62,194 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 853 मृतांची नोंद झाली आहे. सध्या 6,39,075 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.