Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ही पुण्यात (Pune) आहे त्यामुळे अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लस पुरवठ्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून दररोज रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले असले तरी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे एबीपी माझाशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी पुनावाला यांच्याकडे विनंती केली आहे. त्याचबरोबर राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवायचा असून लसीसाठी निधी खर्च करण्यासही सरकार तयार आहे, असंही टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, "अदर पुनावाला पुण्यातील आहेत आणि सीरम इंस्टीट्यूट महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काहीही करुन लस पुरवठ्याबाबतीत त्यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला हवं. आम्हाला 18-44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण वाढवायचं आहे. यासाठी लागणारी किंमत मोजायलाही राज्य सरकार तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असलायला हवं. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल."

"सध्या लस उपलब्ध नसल्याने 18-44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण कमी गतीनं करावं लागत आहे. राज्याकडे निधी असून खर्च करण्याची तयारीही आहे," असेही ते पुढे म्हणाले. (राज्य सरकारला 300 रुपयांना मिळणार Covishield लस; Serum Institute of India चे CEO अदर पुनावाला यांची माहिती)

दरम्यान, जुलैपर्यंत लसीचा तुटवडा भासू शकतो, असे अदर पुनावाला यांनी म्हटलं होत. त्यामुळे सरकारने ऑर्डर दिली नसल्याने लस निर्मिती मंदावल्याच्या बातम्या समाजमाध्यमांत पसरत होत्या. त्यावर अदर पुनावाला यांनी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात त्यांनी सरकार सर्वोतोपरी मदत करत असल्याचं म्हटलं आहे.