
महाराष्ट्रात (Maharashtra) मिशिन बिगीन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्यासाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी 2 तास वाढवून देण्यात आली आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने आता 9 जुलैपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत उघडी ठेवता येणार आहे. सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधीत दुकाने किंवा मार्केट बंद करेल. मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधीत मार्केट आणि दुकान मालक वापर करतील
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मात्र, 3 जूनपासून राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिलिथता देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा 2 मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन-पी टू बेसीस वर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी 2 तास वाढवून देण्यात आले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: यापुढे मुंबईमध्ये कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही; BMC ने जारी केली नवी मार्गदर्शक सूचना
ट्वीट-
दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्यासाठी राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने आता ९ जुलैपासून सकाळी ९ ते सायं ७ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी.#MissionBeginAgain pic.twitter.com/NJNTUo5QJ0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 7, 2020
या महापालिकांमधील कंटेंनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील 7 दिवस परवानगी देण्यात येत आहे. दुकानांना पी वन-पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील 7 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे.