Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात रुग्णवाहिकेची होणारी गैरसोय पाहता महाराष्ट्र सरकारने 500 रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी 90 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका प्रामुख्या ज्या ग्रामीण ठिकाणी वाहतूकीची सोय नाही तेथे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. कारण सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने ग्रामीण भागात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे दिसून आले आहे.

ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांसह दवाखान्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. याचा परिणाम रुग्णांना सहन करावा लागत असल्याने सरकारकडून नव्या 500 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे. सरकारने असे ठरवले आहे की, 253 रुग्णवाहिका या प्राथमिक हेल्थ केअर सेंटर्ससाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. अर्थमंत्र्यांनी असे म्हटले की, यंदाच्या बजेट 2020-21 मध्ये 500 रुग्णवाहिका खरेदी करण्याबाबत सुद्धा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांसाठी मान्यता देण्यात आली आहे.(औरंगाबाद येथे आणखी कोरोनाचे 74 रुग्ण आढळून आल्याने आकडा 12 हजार 421 वर पोहचला)

राज्यात 731 रुग्णवाहिकांची गरज आहे. त्यापैकी 500 रुग्णवाहिका आता उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या रुग्णवाहिकांची खरेदी ही सरकारच्या नियम आणि अटींनुसार केली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकांची सोय प्रामुख्याने ग्रामीण भागात करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत काही वेळेस कोरोनाबाधितांची आकडेवारी सरासरीपेक्षा नियंत्रणात असल्याचे दिसून येते. मात्र ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात RTO च्या माध्यमातून आतापर्यंत 9500 खासगी रुग्णवाहिका रजिस्ट्रर करण्यात आल्या आहेत. तसेच 780 रुग्णवाहिका या मुंबईत रजिस्ट्रर आहेत.(COVID-19 Pandemic मध्ये गर्भवती आणि आजारी असणाऱ्या महिलांना ऑफिसला न येण्याची मुभा- महाराष्ट्र सरकार)

जून महिन्यात भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे याचिका दाखल केली होती. सरकारकडून 108 रुग्णवाहिका चालविल्या जातात त्यापैकी 93 या मुंबईत आहेत. तसेच 3 हजार रुग्णवाहिका या खासगी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर कोरोना व्हायरसच्या काळात खासगी रुग्णवाहिकांची संख्या घटली असल्याचे ही याचिकेत म्हटले आहे.