राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्भवती महिला (Pregnant women) आणि प्रकृती ठीक नसलेल्या (Critical Illness) महिला यांना कामावर न येण्याची मुभा देण्यात आली आहे. यात अधिकारी आणि कर्मचारी महिला या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) सामान्य प्रशासन विभागाने (General Administration Department) दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन उठवल्यानंतर अनलॉकच्या माध्यमातून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र कोविड-19 चे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्याने विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.
अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर सरकारी कार्यालये 15% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर चालू करण्यात आली. परंतु, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता गर्भवती महिला आणि प्रकृती ठीक नसलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर हजर राहणे बंधनकारक नसल्याचे सांगितले जात आहे. मागील महिन्यात महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. यात गर्भवती महिला, अल्पवयीन आणि 50 वर्षांवरील सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉर्म होमची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
ANI Tweet:
Pregnant women officers/workers and women officers/workers who were diagnosed with critical illness to be exempted from coming to office, in wake of #COVID19: General Administration Department, Maharashtra Government
— ANI (@ANI) July 24, 2020
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 254427 वर पोहचला आहे. त्यापैकी 103516 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर 140325 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 10289 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक आहे.