वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकारांना आता कोरोना संकटात मिळणार प्रति महिना 5 हजारांचे महिना; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
Varkari | PC: Twitter/ Amit Deshmukh

कोरोना संकटाने (Coronavirus Pandemic) जगभरात सार्‍याच स्तरातील लोकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दरम्यान सरकारकडून या संकटाचा सामना करत पुन्हा नवं बळ देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रात आता वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकारांना देखील महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला आहे. कोरोना काळात आर्थिक विवंचनेमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला आहे. राज्य सरकारने आता वारकरी संप्रदायाचाही त्यामध्ये समावेश केला असून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही पाच हजाराचे मानधन मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात आजच्या घडीला 10 हजारापेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक आहेत. त्यांना या घोषणेमुळे कोरोना काळात महिन्याला पाच हजाराचे मानधनाचा फायदा मिळेल. याच सोबत राज्यातील पारंपरिक वारकरी फड प्रमुखाला कायमस्वरूपी मानधन देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. संत विद्यापीठासह इतर मागण्या देखील राज्य सरकारने तत्वतः मान्य केल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.(नक्की वाचा: राज्यातील 28 हजार वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे 2 महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करणार; सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती).

दरम्यान काल (8 सप्टेंबर) वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते.