Coronavirus Help Center (Photo Credits: File Image)

चीन (China) मध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सावट आता भारतामध्ये सुद्धा दिसू लागले आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीनमधून परतलेले दोन जण सध्या रूग्णालयात दाखल आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील जी.टी. रुग्णालयात आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘कोरोना व्हायरस’ संदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे 104 क्रमांकावर संपर्क साधून संबंधित माहिती मिळवता येणार असल्याचे समजत आहे. याबाबत @Mahadgpir या ट्विटर हॅण्डल वरून माहिती देण्यात आली आहे.

(Coronavirus च्या पार्श्वभुमीवर लखनौ, मुंबई येथील विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित)

सध्या मुंबईमध्ये इंटरनॅशनल विमानतळावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चिंचपोकळी परिसरातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विशेष वॉर्डची सोय करण्यात आली आहे. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या खास वॉर्ड कोरोना व्हायरसचे निदान आणि उपचार करण्यासाठी आरक्षित असणार आहे. आतापर्यंत या व्हायरस मुळे चीन मध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे तसेच भारतातही काही ठिकाणी पाच संशियत रुग्ण आढळून आले आहेत, या व्हायरस ला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून अशा प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना व्हायरस म्हणजे नेमके काय? लक्षणे आणि खबरदारीचे उपाय घ्या जाणून

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सर्दी पडशापासून श्वसनाच्या विकारांचा धोका बळावला आहे. म्ह्णूनच पालिकेच्या डॉक्टरांनी, माईल्ड कफ आणि सर्दीशी निगडीत काही लक्षणं आढळल्याने संशयित रूग्णांना विशेष देखरेखीखाली ठेवले आहे.