अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारकडून 11 करोड रुपयांची मदत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात प्रत्येकवर्षी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते, त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आजकाल तर अवकाळी उगवणारा पाऊस (Unseasonable Rain) देखील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतो. राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल तेव्हा होईल; मात्र या उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 11 करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंगळवारी या आदेशाला सरकारने मंजुरी दिली असून, लवकरच ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. (हेही वाचा : महाराष्ट्रात तब्बल 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर)

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे एकूण 12,726 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 5,093.65 हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांना या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाचा तोटा सहन करावा लागला. तर मे महिन्यात 4,409 इतक्या शेतकऱ्यांच्या 1,740.74 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आता सरकारकडून 8,14,98,540 रुपये एप्रिलमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, तर  2,93,00,655 रुपये मेमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मिळणार आहेत.

हे शेतकरी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती महसूल विभागातील आहेत असे जीआरएसने सांगितले आहे.