Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

कोविड-19 संकटाच्या (Covid 19 Pandemic) पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र त्यांना देखील लोकल प्रवास करताना अडथळे येत असल्याचं समोर आलं आहे. यावरुन राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी वैध ओळखपत्र असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मासिक पास द्या, असे म्हटले आहे. (कोविड19 लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी लोकल रेल्वे प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णयाचे मंत्री आदित्य ठाकरे यांंचे संकेत)

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं वैध ओळखपत्र असलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असूनही अनेक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करता येत नाही. परिणामी त्यांना कामावर पोहचण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, असं या पत्रात म्हटलं आहे. तसंच वैध ओळखपत्र असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मासिक पास देण्यात यावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईत कोविड-19 निर्बंधात शिथिलता देण्यात आली असून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काल भाजपने यासाठी आंदोलन केलं असून मनसेकडूने रेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची या पक्षांची मागणी आहे. (मुंबई मध्ये भाजपा चं 'रेलभरो आंदोलन'; प्रविण दरेकर, अतुल भातखळकर रेल्वे प्रवासासाठी स्टेशन वर)

पूर्ण लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत घेण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात मागील 2-3 आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय समजेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर पूर्ण लसीकरण झालेल्यांना केवळ लोकल प्रवासातच नाही तर इतर गोष्टींमध्येही सवलत मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.